दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम साहित्याचे घरपोच वाटप
लातूर,दि.29 (जिमाका) :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड (एलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे देण्यासाठी दिनांक-31 डिसेंबर,2019 ते दिनांक-07 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये तपासणी शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते.
या तपासणी शिबीरामध्ये पात्र असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वितरण करण्याच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्य अध्येक्षतेखाली दि. 29 मे 2020 रोजी संपन्न झाली. या बैठकीत आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी कृत्रिम तपासणी शिबीरे यशस्वी केल्याने हा उपक्रम दिव्यांग क्षेत्रात संपूर्ण राज्यामध्ये मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली. समाजकल्याण विभाग, जि. प. व जिल्हा परिषद प्रशासकीय यंत्रणा, सर्व पंचायत समित्या यांच्या कामकाजाचीही प्रसंशा केली.
या बैठकीस जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य रमेशआप्पा कराड खासदार सुधाकर शृंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंम्मत जाधव, कार्यवाहक संवेदना सेरेब्रल विकसन केंद्राचे सुरेश पाटील या मान्यवरांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन व सूचना केल्या.
तपासणी शिबीरामध्ये साहित्य वाटपासाठी एकूण 8797 दिव्यांग लाभार्थी पात्र झालेले आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांना त्याच्या दिव्यांगत्वानुसार तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव-हातपाय, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठया, सी.पी. चेअर, वॉकर, एम.आर. कीट, स्मार्ट केन, डेसी प्लेअर, ब्रेल कीट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र, मोटाराईज्ड सायकल इत्यादी साहित्य मोफत वाटप केले जाणार आहे. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना संचार बंदीच्या कालावधीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून त्यांना आवश्यक असणारे व मंजूर झालेले साहित्य सबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी तालुका समन्वयक म्हणून काम करावे त्यांना सहाय्य करण्यासाठी गट साधन केंद्रा अंतर्गत शिक्षक व दिव्यांग शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची तालुकानिहाय गट करून योग्य असे नियोजन करावे व ग्रामसेवक- ग्रामविकास अधिकारी तसेच शहरी भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना महानगर पालिका,नगर परिषद यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप घरपोच करावे. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड (एलिम्को) यांच्या मार्फत उपलब्ध होणारे साहित्य तालुका-निहाय मिळणार असून प्रशासनाने दिव्यांग व्यक्तींना साहित्य घरपोच व मोफत करावे,अशा सूचना बैठकीत दिल्या.
या बैठकीस समाज कल्याण सभापती रोहीदास वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, बापुराव राठोड, भारत कांबळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकता दत्तात्रय कुंभार, निरीक्षक व्यंकटेश लामजने उपस्थित होते.